विनापरवाना कँडल मार्च, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

0

 

छत्रपती संभाजीनगरः औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात एमआयएम या पक्षाने आंदोलन पुकारले असून काल एमआयएमच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चला पोलिसांची परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कँडल मार्च काढल्याने त्यांच्यासह 1500 जणांवर शहरातील सिटी चौक (Candle March in Chhatrapati Sambhaji Nagar)पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
खासदार इम्तीयाज जलील यांच्यासह औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अय्युब जहागीरदार, महमुझ उर्रहमान फारुकी, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी तसेच औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच इतर हजारो कार्यकर्त्यांवरकलम 143 भा.दं.वि. व म.पो. का. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अलिकडेच केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाले आहे. एमआयएम ने या निर्णयाला विरोध दर्शवित आंदोलन सुरु केले आहे. या निर्णयाच्या विरोधात एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले होते. काल गुरुवारी या निर्णयाच्या विरोधात कँडल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी, स्थानिक पोलिसांनी अनुचित प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, त्यानंतरही मोर्चा काढण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा