सांगली : पश्चिम महाराष्ट्रात तब्बल १४ ठिकाणांवर ईडीचे छापे पडले असून त्यात प्रामुख्याने राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित आहे. या बँकेकडून 10 वर्षांपूर्वीच्या हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडी कडून सुरु असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामबापू बँकेने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात वळती केल्याचा आरोप आहे. बँकेने हे व्यवहार लपवून ठेवले होते, असाही आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे. बँकेशी संबंधित सीएच्या कार्यालयावर देखील छापा पडला. दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. काल सकाळपासूनच ही कारवाई सुरु आहे. ईडीने सांगलीतील पारेख बंधूंसह पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकल्याची माहिती असून व्यापाऱ्यांची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली. पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याची माहिती आहे.