Home Top News वारकऱ्यांना मोठा दिलासा, महापुजेच्या काळातही विठ्ठलाचं मुखदर्शन सुरुच राहणार

वारकऱ्यांना मोठा दिलासा, महापुजेच्या काळातही विठ्ठलाचं मुखदर्शन सुरुच राहणार

0

पंढरपूर- वारीसाठी लाखो वारकरी पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाची वारकऱ्यांना आस लागलेली असते. त्यामुळे वारकऱ्यांना विनाअडथळा व लवकरच दर्शन व्हावे, या हेतूने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Ashadhi Vitthal Darshan Decision) विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असताना दर्शनाची रांग बंद करण्यात येणार नाही. त्यामुळे वारकऱ्यांना महापुजा सुरु असतानाही विठ्ठलाचे मुखदर्शन सुरूच असणार आहे. रांगेत लागणाऱ्या वारकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामागील कारण म्हणजे महापुजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद केली जायची. त्यामुळे वारकऱ्यांना कित्तेक तास ताटकळत रहावे लागत होते.
पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत याबाबतची माहिती दिली. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत ही शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो. या निर्णयामुळे या कालावधित जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी तीस-तीस तास रांगेत उभे राहतात. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दर्शनाची रांग विनाअडथळा सुरु राहणार असून वारकऱ्यांना दर्शनासाठी फार विलंब लागणार नाही, असा अंदाज आहे.