माजी अतिरिक्त आयुक्तांकडे १०० कोटींची बेनामी मालमत्ता

0

मुंबई-मुंबई महानगर पालिकेतील घोटाळ्याची चौकशी ईडीने हाती घेतली असताना महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे १०० कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीचे दस्तऐवज ईडीच्या हाती लागले आहेत. ईडीने या प्रकरणी पाच ते सहा अधिकाऱ्यांवर छापे टाकले होते. माजी आयुक्त जयस्वाल यांच्या पत्नीकडे सुुमारे ३४ कोटींची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. मढ परिसरात त्यांचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड असल्याचे सांगण्यात आले. (BMC Scam Investigation) १२ हजार कोटींच्या या कोरोना घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली (SIT Investigation) आहे. त्यांच्यामार्फतही स्वतंत्रपणे चौकशी सुरू झाली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने संजीव जयस्वाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी चार दिवसांची मुदत मागितली होती. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची सोमवारी चौकशी होणार असल्याची माहिती आहे. कोव्हीड काळात मुंबई महानगर पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्या काळात किशोरी पेडणेकर या मुंबईच्या माजी महापौर होत्या. कोविड घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला जात असून त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.