यादवांची कमाल १५० कोटीचे घर ४ लाखांत ईडीने उघड केली जंत्री : १ कोटी रोख, दीड किलो सोने जप्त

0

नवी दिल्ली. :  नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ईडीने (ED) आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव (RJD chief Lalu Prasad Yadav ) आणि यांच्या कुटुंबावर धाड टाकली. घरात झाडाझडती, चौकशीनंतर ईडीने यादव कुटुंबाची जंत्रीच उघड केली आहे. दिल्लीच्या पॉश न्यू फ्रेंड्स कॉलनीत तेजस्वी यादव यांचा ४ मजली बंगला केवळ ४ लाखात खरेदी केला होता. सध्या या बंगल्याची किंमत बाजारभावानुसार १५० कोटी रुपये आहे. ही संपत्ती एबी एक्सपोर्ट्स लिमिटेड नावाने नोंदणीकृत आहे. सध्या यावर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नियंत्रण आहे. याशिवाय कुटुंबीयांकडे १९०० डॉलर, ५४० ग्राम गोल्ड बुलियन आणि १.५ किलोपेक्षा जास्त सोने (ज्याची किंमत १.२५ कोटी), परदेशी चलन जप्त केले आहे. यादव कुटुंबातील सदस्य आणि अज्ञातांच्या नावे असलेल्या विविध संपत्ती, मालमत्तेचे कागदपत्रेही जप्त केली आहेत.

ही यादी इथेच संपत नाही तर जवळपास ६०० कोटींच्या बेनामी संपत्तीचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये ३५० कोटी रुपयांच्या स्थिर मालमत्तेचा समावेश आहे. विविध बेनामीदारांच्या माध्यमातून २५० कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि कुटुंबाने पटणा तसेच अन्य भागात अनेक जमिनी बेकायदेशीररित्या अधिग्रहण केल्या. ज्याची सध्या किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या जमिनीवर अनेक बेनामीदार, शेल संस्था आणि लाभार्थी ओळखले गेले आहेत.
काही मुंबईस्थित संस्थांकडून रत्ने आणि दागिन्यांचा व्यवहार करायचा होता, ज्यासाठी चुकीच्या पद्धतीने मिळवलेले पैसे वापरले गेले. कागदावर मालमत्ता एबी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयाच्या नावाने दाखवली आहे. परंतु तेजस्वी यादव याचा वापर राहण्यासाठी करत आहेत. इतकेच नाही तर छापेमारीवेळी तेजस्वी यादव या बंगल्यात राहत होते. त्याचा वापर कुटुंबाच्या निवासासाठी केला जात होता असा दावाही करण्यात आला.

रेल्वेत नोकरी, बदल्यात जमिनी

लालूप्रसाद यादव कुटुंबीयांनी ग्रुप-डी अर्जदारांकडून केवळ ७.५ लाख रुपयांना चार भूखंड घेतले आणि राबडी देवी यांनी संगनमताने ते माजी आरजेडी आमदार सय्यद अबू दोजाना यांना ३.५ कोटी रुपयांना विकले. या रकमेतील मोठा हिस्सा तेजस्वी यादव यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप एजन्सीने केला आहे. गरीब उमेदवार आणि त्यांच्या पालकांकडून रेल्वेतील ग्रुप डी नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेण्यात आल्या. अनेक रेल्वे झोनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांपैकी ५० टक्के पेक्षा जास्त उमेदवार लालूप्रसाद यादव यांच्या मतदारसंघातील होते. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचाही तपास केला जात आहे.