बुलढाण्यात अवकाळी पाऊस पीकांवर परिणाम

0

बुलडाणा: हवामान खात्याने यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुलढाण्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला. जवळपास अर्धा तास हा पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, शेतातील काढणीला आलेल्या रब्बी पिकाला मात्र धोका निर्माण झाला आहे. 5 मार्च ते 7 मार्च दरम्यान जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. तो अंदाज खरा ठरत बुलढाण्यात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास हा जोरदार पाऊस पडत राहिला. या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहू, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे व पालेभाज्यांना फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या कडून करण्यात आले आहे. शिवाय या अवकाळी पावसामुळे सर्दी, खोकला आणि ताप सारखे आजार पसरण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.