श्री पोद्दारेश्वर राम मंदिरचा शताब्दी महोत्सव, लावले 31हजार दिवे

0

 

नागपूर : ऐतिहासिक रामनवमी शोभयात्रेचे आयोजन करणाऱ्या नागपुरातील श्री पोद्दारेश्वर राम मंदिराला आज शनिवारी 4 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. शताब्दी स्थापना दिनाच्या निमित्ताने 1 ते 4 मार्च दरम्यान विविध धार्मिक अनुष्ठान व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दीप दर्शन सोहळा आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरला .तिरुपती,रामेश्वरम या प्रसिद्ध दाक्षिणात्य मंदिराप्रमाणे पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशात दर्शनाचा आनंद श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात यावेळी घेता आला. आज 31 हजार दिव्यांची आरास रामझुल्यावर, मंदिर परिसरात करण्यात आल्याने हा परिसर दिव्यांची रांगोळी काढल्यागत लखलखत होता. याकाळात परिसरातील सर्व दिवे मालविण्यात आल्याने पोद्दारेश्वर मंदिर परिसरात मोठ्या संख्येत जमलेले भाविक जणू काही दिवाळीचा अनुभव घेत होते. श्री पोद्दारेश्वर राममंदिर ट्रस्टचे पुनीत पोद्दार, माजी महापौर दयाशंकर तिवारी, श्रीकांत आगलावे आदींनी यासाठी गेले अनेक दिवस परिश्रम घेतले. गतवर्षी देखील रामझुल्यावर मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. 1 मार्चला मंदिर परिसरात 21 हजार दिवे प्रज्ज्वलित केले गेले. ओम, स्वस्तिकसह अन्य धर्मिक आकृत्या यावेळी दिव्यांनी साकारण्यात आल्या. एकंदरीत हा दीपोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा