पळस फुलांनी बहरल्या रानवाटा

0

 

नागपूर : निसर्ग स्वत:च एक कलावंत आहे. त्यांच्या ऋतुचक्रातील एकापेक्षा एक अशी किमया दडलेली आहे. शिशिर ऋतू एव्हाना संपला असून वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे. त्यामुळे वृक्षांनीही आपली जुनी झालेली पाने सोडून नवीन पालवी धारण करायला सुरुवात केली आहे. आंबा, कडूलिंब यासारखे काही वृक्ष याच हंगामात मोहोरानं फुलतात. बहरतात. पळस आदी काही झाडं केशरी लाल रंगाची मुक्त उधळण करत फुलांचा डोलारा घेऊन उन्हाळ्यातली दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतात.
सध्या वनात पळस व काटसावरीची फुले आकर्षण रीतीने बहरली आहेत. तर काही वृक्षांना हिरवी पालवी फुटली आहे. होळी, रंगपंचमी आली की, जुन्या पिढीला पळस फुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी याच फुलांचा रंग बनवून रंगपंचमी साजरी केली जात असे.
हिवाळा संपला की, जंगलातील पाणवठे सुकायला सुरुवात होते. उन्हाचा तडाखा वाढतो. ही रानफुले मग जंगलातील व्याकूळ पाखरांना तहानभूक भागवण्यासाठी स्वतःतील द्रव पुरवितात, म्हणूनच तापत्या उन्हात या फुलांनी फुललेल्या झाडावर मैना, पोपट, बुलबुल असे अनेक पक्षी, मधमाशा दिसायला लागतात… निसर्गाच्या किमयेची चुणूक त्यातून जाणवते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा