आमची पानटपरी… कुठे लावायची ते कुणीही शिकवू नये

0

आमदार बच्च कडू यांचे सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर
अमरावती. ठाकरे गटातील नेते शिवगर्जना यात्रेच्या (Shivgarjana Yatra ) निमित्ताने राज्यभर फिरून जनतेशी संवाद साधत आहेत. याच शृंखलेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) अमरावती (Amravati) भेटीवर आल्या होत्या. त्यांनी जाहीर सभा घेऊन विरोधकांवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत तोफ डागली. देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत असल्याचे विधान त्यांनी केले होते. आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu ) यांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचा आणि आमचा संबंध कुठे आला इथे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमचा स्वत:चा पक्ष आहे. स्वत:ची मेहनत आहे. आमची स्वत:ची पानटपरी आहे. ही पानटपरी कुठे लावायची, हे आम्ही ठरवू. त्यामुळे आम्हाला कुणी गद्दार म्हणण्याचे शहाणपण शिकवू नये. आम्ही गद्दारी केली नाही. माझ्या प्रचारासाठी सभा घ्यायला उद्धव ठाकरे आले नव्हते. तरीही तुम्ही आम्हाला गद्दार कसे म्हणू शकता? याशब्दात त्यांनी पलटवार केला आहे.
मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा
खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू म्हणाले, आमच्या पक्षाचे नाव प्रहार आहे. आम्ही वार करतो, आम्ही फसत नाही. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जात नाही. आम्ही नुकतेच १५० कोटींचा निधी मिळवला. यामध्ये रस्ते विकासासाठी कालच १२७ कोटी रुपये मंजूर केले. अचलपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम आली आहे. मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे. आमची पंधरा वर्षे अशीच गेली. आम्ही सत्तेच्या बाहेर पडून आंदोलनं केली. भांडणं केली. त्याकाळात मतदारसंघ थोडा मागे राहिला. आता आपण चार प्रकल्प मंजूर केले आहेत. शेवटी मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा असतो.
कुणासोबत जायचे ते आम्ही ठरवू
गुवाहाटीला जायचे की नाही? हे कोण ठरवणार? गेली २० वर्षे आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे कुठे जायचे आणि कुठे नाही? हे आम्ही ठरवणार आम्ही स्वत:च्या अंगावर केसेस घेतल्या. आम्ही लोकांचा मार खाल्ला. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर बसायचं? हे आता तुम्ही सांगणार का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा