सारेच चमत्कारिक!

0

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद क्षणाक्षणाला चमत्कारिक वळण घेत आहे. आता याच प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराज यांना स्पष्ट क्लिनचीट दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याचा मसूदा अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांच्या नेतृत्वात तयार झाला. त्यांनीच अंधश्रद्धेच्या टप्प्यात येणाऱ्या बाबी आणि शिक्षाही सूचविली. कायदा तयार झाल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभरात पोलिसांच्या कार्यशाळाही घेतल्या. यामुळेच या कायद्याचा नेमका अर्थ अधिकारवाणीने सांगण्याचा अधिकारही त्यांचाच. असाच सर्वासामान्यांचा समज असेल. पण, नागपूर पोलिसांनी दिलेल्या एका निर्णयामुळे हा समज सपशेल चुकीचा ठरला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपुरातील रामकथेदरम्यान दोन दिवस दिव्य दरभारही भरविला गेला. त्यावर अंनिसचे श्याम मानव यांनी आक्षेप नोंदविला.

धीरेंद्र महाराज यांचा दिव्यशक्तीचा दावा थोतांड असून, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची मागणीही आहे. त्यांनी महाराजांना दिव्यत्व सिद्ध करून ३० लाखांचे बक्षीस मिळविण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर धीरेंद्र महाराज रायपूरला निघून गेले. मानव यांनी महाराज पळाल्याचा दावा केला. त्याचवेळी धीरेंद्र महाराज समोर आले आणि आव्हान स्वीकारल्याची घोषणा केली. दोन्ही पक्षांमध्ये शब्दिक वाद सुरू असतानाच श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली. यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. पण, त्यानंतर लगेच धीरेंद्र शास्त्री यांनाही फोनवरून धमकी दिली गेली. महाराजांच्या चुलत भावाच्या मोबाईलवर धमकीचा कॉल आला. या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्याम मानव यांचा आक्षेप आणि दिलेले आव्हान वगळता अन्य साऱ्याच बाबी त्यांचे टायमिंग चमत्कारिकच वाटते.

सर्वात कहर म्हणजे नागपूर पोलिसांनी याप्रकरणात दिलेली क्लिनचीट. खुद्द पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या विषयावर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. आम्ही कार्यक्रमाशी संबंधित व्हीडिओंची बारकाईने तपासणी केली. त्यात गैर असे काहीच आढळले नाही. यामुळे क्लिनचीट देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो असल्याचे ते म्हणाले. पण, कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्या व्यक्तीचीच अंधश्रद्धेची तक्रार अशाप्रकारे खारीज केली जात असेल, तर सर्वसामान्यांच्या तक्रारींचे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा