हवेत उडून शत्रूचा सामना, लष्कराच्या जवानांना मिळणार हायटेक जेट पॅक सुट!

0

नवी दिल्ली : संवेदनशील सीमेवरील जवानांना अधिक हायटेक करण्याच्या दृष्टीने संरक्षण विभागाने अतिशय महत्वाचे पाऊल उचलले आहे. जवानांना वेगाने हवेत उडून शत्रूचा सामना करता यावा, यासाठी अत्याधुनिक जेटपॅक सुट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला (Army to get hightec Jetpack Suits And Robotic Mules) असून जेटपॅक सुटसह रोबोटीक म्यूल तसेच अत्याधुनिक ड्रोन सिस्टीम्सचीही खरेदी केली जात आहे. संरक्षण विभागाने लष्करासाठी ही “तातडीची” खरेदी प्रक्रिया सुरु केली असून त्यासाठी संबंधित निर्मात्यांकडून प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरुही केली आहे. येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत निर्मात्यांना या उपकरणांसाठी बोली (Bids) सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या अत्याधुनिक साहित्यामुळे जवानांची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून सीमेवर सुरु असलेल्या हालचाली लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जेट पॅकमध्ये जेट प्रपोल्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तो पाठीवर लादून व्यक्तीला हवेत काही उंचीपर्यंत उडणे शक्य होते. सीमेवरील जवानांना आणिबाणीच्या परिस्थितीत परिस्थितीचा अंदाज घेण्यासह सर्वच दृष्टीने जेट पॅक्सचा उपयोग होऊ शकतो. विशेषतः भारत-चीन सीमेवरील अतिउंच प्रदेशांमध्ये त्याची उपयुक्तता मोठी असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. समतल प्रदेश, पर्वतीय, वाळवंटी प्रदेश तसेच ३ हजार मीटर उंचीवरूनही वापरता येतील, अशा पद्धतीचे जेटपॅक्स लष्कराला हवे आहेत. जेटपॅक्सची वाहतूक सहजशक्य असावी तसेच ते कुठल्याही प्रकारच्या हवामानात स्टोअर करून ठेवता यावेत, असेही संरक्षण दलाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे. जेटपॅकशिवाय लष्करासाठी चार पायांचे रोबोटिक म्यूल तसेच अत्याधुनिक ड्रोनची देखील खरेदी होणार आहे. ज्या ठिकाणी जवानांना जीव धोक्यात घालून वावरावे लागणार आहे, त्या ठिकाणी रोबोटीक म्यूलचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मनुष्यहानी टाळता येणार आहे. 48 जेटॅपॅक, 100 रोबोटिक म्यूल आणि 130 ड्रोन या सामुग्रीची खरेदीची योजना असून ही खरेदी केवळ फास्टट्रॅक स्वरुपाचीच नाही तर ती स्वदेशी उत्पादकाकडून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शत्रूकडून येणाऱ्या ड्रोनची घुसखोरी टाळण्यासाठी २० ड्रोन जॅमर्सच्या खरेदीचीही योजना आहे