धीरेंद्र शास्त्रींना नागपूर पोलिसांची क्लीन चीट
नागपूर (nagpur) : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी नागपुरात अंधश्रद्धा (Superstition) पसरविल्याचे कुठेही दिसत नसल्याने त्यांच्यावर कुठलाही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांना विचारण्यात आले असता त्यांनी या मुद्यावर विस्तृत माहिती दिली आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या ७ व ८ जानेवारीच्या दिव्य दरबाराच्या संदर्भातील व्हिडिओ आम्ही बारकाईने तपासले असून त्यात कुठेही २०१३ च्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळून आलेले नाही, असा निर्वाळा पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धिरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात नागपूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. यात बागेश्वरधामचे धिरेंद्र शास्त्री हे आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याचे सांगत अंधश्रद्धा पसरवित असल्याचा दावा करण्यात आला होता. समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव (shyam manaw) यांनी बागेश्वरधामचे धिरेंद्र शास्त्री महाराज यांना दिव्यशक्ती सिद्ध करून दाखविल्यास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर दोन्ही बाजुंनी दावे प्रतिदावे करण्यात आले. मात्र, त्यानंतर या प्रकरणात काहीच घडले नाही. दरम्यान, यांसदर्भात नागपूर पोलिसांना विचारण्यात आल्यावर पोलिसांनी आज यावर स्पष्टीकरण देत गुन्हा दाखल झाला नसल्याचे स्पष्ट केले. व्हिडिओ तपासण्यात आल्यावर त्यात कुठेही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही, असा दावा पोलिसांनी केलाय.
दरम्यान, या प्रकरणात अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांना दोन दिवसांपूर्वी धमक्या मिळाल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुरुवातीला श्याम मानव यांना दोन सशस्त्र जवानांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. आता त्यात आणखी दोन सशस्त्र गनमेन आणि तीन पोलिस कर्मचारी तैनात राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.