पुणे: पुणे जिल्ह्यात अंगावर काटा आणणारे हत्याकांड उघडकीस आले आहे. पारगाव येथील भीमा नदीत मंगळवारी 7 जणांचे मृतदेह आढळून आढळून आले होते. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, त्या आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले (Murder Case in Pune District) आहे. या घटनेत तीन लहान मुलांसह एकूण सात जणांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे कारणही स्पष्ट झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ),प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय 32), पत्नी राणी शामराव फुलवरे (वय 27), त्यांचा मुलगा रितेश शामरावर फुलवरे (वय 7), छोटू शामराव फुलवरे (वय 5) व कृष्णा फुलवरे (वय 3) या सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळले होते. मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद येथे राहत होते.
हे ठरले कारण
मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा एक मुलगा मोहन पवार यांच्या मुलासह दुचाकीवर जात असताना त्याचा अपघात झाला. या अपघाताची माहिती पवार यांनी उघड केली नाही. उपचार सुरु असताना मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्या मुलाचा खून झाल्याचा संशय त्यांना होता. या रागातून पवार कुटुंबीयांचा काटा काढण्याचा कट रचला गेला. घटनेच्या दिवशी आरोपींनी मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांना गावाला नेण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले. भीमा नदीच्या पात्राजवळ नेऊन सातही जणांना आरोपींनी ठार केले व नंतर भीमा नदीच्या पात्रात त्यांचे मृतदेह टाकून दिले, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.