ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे पुरावे, कुस्तीपटूंचा दावा

0

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषणसिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंनी आमच्याकडे लैंगिक शोषणाचे पुरावे असल्याचा दावा (Sexual Harassment of Women Wrestlers) केला आहे. कुस्तीपटू विनेश फोगटने यासंदर्भात क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना धक्कादायक माहिती उघड केली आहे. महिला खेळाडूंचे बंद खोलीत शोषण केले जात होते. ज्या मुलींचे शोषण झाले त्यांच्याकडे स्वतः पुरावे देखील आहेत, असे विनेश फोगट हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षक आणि कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा दावा तिने केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना विनेशने सांगितले की, मला स्वतःला अशा शोषणाचा सामना करावा लागलेला नाही. मात्र, काही कुस्तीपटूंना तसा अनुभव आला आहे. लखनौमध्ये कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांचे घर आहे. तेथेच शिबीरांची आयोजने केली जातात. त्यांच्या सांगण्यावरून महिला कुस्तीपटूंशी संपर्क साधतात. त्यामुळे मुलींचे लैंगिक शोषण करणे सहज शक्य होते, असा आरोप विनेश फोगटने केला आहे.
अध्यक्षांविरुद्ध पुरावे
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. पाच ते सहा मुली आहेत, ज्यांचे लैंगिक शोषण झाले आहे आणि ते सिद्ध करणारे पुरावे आमच्याकडे आहेत, असेही तिने सांगितले. आम्ही हे सर्व सार्वजनिक करु इच्छित नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन व ब्रिजभूषण शरणसिंह यांचा राजीनामा घेऊन त्यांना तुरुंगात पाठवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. महिला कुस्तीपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न देखील ब्रिजभूषणसिंह यांनी केला असल्याचे तिने सांगितले.