फडणविसांचा गौप्यस्फोट, पवारांचा इन्कार, संजय राऊतांचा दावा

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या गौप्यस्फोटाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. तो शपथविधी शरद पवारांच्या सहमतीनेच झाला होता, असे काल फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी (NCP President Sharad Pawar) लगेच त्याचा इन्कार केला. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत, सभ्य व्यक्ती आहे, असे आपल्याला वाटत होते. मात्र, ते असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची वक्तव्य करतील असे मला कधी वाटले नाही, असे पवार म्हणाले. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी फडणवीस हे आमच्या प्रतिमांना तडा देण्यासाठी खोटे वक्तव्य करीत असल्याचा दावा केलाय.
काल एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती. त्यांना स्थायी सरकार हवे होते. त्यामुळे आपण सरकार स्थापन करुया, असा त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता. राजकारणात एकदा धोका मिळाल्यावर कोणी चेहरा पहात बसत नाही. आम्हीही निर्णय केला व राष्ट्रवादीशी चर्चा केली. चर्चा शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सर्व गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितले आहे. यात शिवसेनेकडून झालेला पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो कारण तो आमच्यासोबत राहिलेल्या व्यक्तीने केला होता, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, पवारांनी या दाव्याचा इन्कार केला तर संजय राऊत यांनी अविश्वास दर्शविला. उपमुख्यमंत्री फडणवीस हे हे जगातील दहावे आश्चर्य असल्याचे राऊत म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी ते खोटी वक्तव्य करीत आहेत. ते आणखी पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच सरकार चालले असते. सरकार 72 तासात कोसळले नसते असेही संजय राऊत म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा