बीबीसीच्या दिल्ली, मुंबई कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

0

नवी दिल्ली : बीबीसीच्या (IT Raid on BBC Delhi, Mumbai Office) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. आयकर विभागाच्या पथकाने सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बीबीसीच्या दिल्ली येथील कार्यालयात जाऊन झडत्या सुरु केल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ चित्रिकरण करू नये, यासाठी कर्मचाऱ्यांचे फोन पथकाने ताब्यात घेतले असून कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. या छापेमारीत ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती आहे. दरम्यान, बीबीसीच्या दिल्ली, मुंबईसह इतरही कार्यालयांवर छापे पडले असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रदर्शित केलेल्या वादग्रस्त माहितीपटावरून मोठा वाद सुरु असतानाच आयकर विभागाचे हे छापे पडले आहेत. दरम्यान, या कारवाईवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून देशात अघोषित आणिबाणी लागू झाली असल्याची टीका काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे.
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केला असून त्यावर देशात बंदी घालण्यात आली आहे. माहितीपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज बीबीसीच्या दिल्ली कार्यालयावर आयकर छापे पडले आहेत. आयकर विभागाने ही सर्च कारवाई असल्याचा दावा केलाय.
दरम्यान, लंडनमध्ये गेल्या महिन्यात भारतीय समुदायाने बीबीसीच्या मुख्यालयापुढे निदर्शने केली होती. बीबीसीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी देखील होत आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा