मुंबई- आम्ही कुणाच्या परिवारावर बोलत नाही, फडणवीसांनी आमच्या परिवारावर बोलू नये. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंबाला वाचविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ही शिवसेना माझे कुटुंब आहे. माझ्या वडीलांचे अजोबा देखील प्लेगच्या साथीच्या वेळेस काम करत होते. मी नायक आहे की खलनायक आहे हे जनता ठरवेल, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेवर केला. (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)
काल पाटणा येथे झालेली बैठक ही परिवाराची, परिवार वाचविण्याची बैठक होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी परिवारावर न बोलण्याचा सल्ला फडणवीस यांना दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, “देवेंद्रजी, एवढ्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला देखील आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर आले आहेत, बाहेर येत आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो, तर तुम्हाला शवासन करावे लागेल. वेगळी कोणती आसने तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावे लागेल” असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, या सरकारचा जन्मच मुळात खोक्यांतून झाला आहे. ते काय चौकशी करणार. आम्ही चौकशीला घाबरत नाही. चौकशी करायची तर ठाणे मनपाची चौकशी करा. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीच ही मागणी केली आहे. पण या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचीच काही किंमत नाही, तर केळकरांची काय असणार. पीएम केअर फंडाची चौकशी करायला हवी.जशी आमची चौकशी करता आहात, तशी तुमची चौकशी करायला हवी. पिंपरी – चिंचवड, पुणे, नागपूर मनपाची चौकशी करायला हवी, असे ठाकरे म्हणाले.
मेहबुबा मुफ्ती माझ्या बाजूला बसल्या, असे तुम्ही म्हणता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तुमच्या बाजूला बसले आहेत. मोठी लोक ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपण जायला हवे म्हणून आम्ही गेलो. मी चुकीचा असेल तर भाजपचे नेते चुकले हे सर्वांनी मान्य करावे, माझ्याविरोधात संपूर्ण भाजप उभी राहिली आहे, असे ठाकरे म्हणाले.