अकोला – अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल आहे. तर गारपीटीमुळे जिल्ह्यातील पातुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल. काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे बार्शीटाकळी तालुक्यातील वाघझळी गावातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. संतोष चिंचोळकर आणि मारुती व्यवहारे या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा वाहून गेला आहे, तर काढलेला कांदा म्हणजेच कांद्याचे ढिगारे पाण्याखाली गेल्यानं पूर्ण कांदा नष्ट झाला आहे. आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करत आहे. तर संतोष चिंचोळकर या शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. सोनं गहाण ठेवून पैसा जमावला इतर ठिकाणी कर्ज घेऊन कांद्याची तीन एकरात लागवड केली , तर आता हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालं आहे. गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पीकाचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे.