पुणे- सातारा महामार्गावर (Pune-Sarata Highway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कंटेनर आणि बसच्या विचित्र अपघातामध्ये (container and bus Accident) चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा जिल्ह्यातल्या वरवे गावाच्या हद्दीत झाला. अपघातानंतर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून (Satara Police) सुरु आहे.
या अपघातामध्ये खासगी बस पलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अपघातात एसटीच्या शिवनेरी बसचेही मोठं नुकसान झालं आहे.
कसा झाला अपघात?
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका बसने मागून जोराची धडक दिली. या धडकेत बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी आहेत. याचवेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे. हा अपघात एसटीच्या भोर आगाराच्या हद्दीमध्ये घडला असून आगारातील एसटीचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.