बुलडाणा : राज्याच्या समृद्धीचा राजमार्ग म्हणून उल्लेख होतो तो समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway ) मृत्यूचा सापळा ठरला आहे. उद्घाटनापासूनच या महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे (series of accidents continues). आजवर त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रविवारी (१२ मार्च) सकाळी बुलडाण्यातील मेहकरजवळ (Mehkar from Buldana ) या महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ६ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर सात प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहीची प्रकृती अत्यवस्थ असल्याचेही सांगितले जात आहे. राज्यातला मोठा महामार्ग अशी ख्याती असलेला आणि नुकतंच लोकार्पण झालेला समृद्धी महामार्ग सातत्याने अपघातांमुळे चर्चेत आहे. अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे सारेच निष्फळ ठरत आहे. अपघातात वाहनचालकांचा जीव जात असल्याने अनेकजण या मार्गावरून जाणेही टाळू लागले आहेत.
बुलडाण्यातील मेहकरजवळ भरधाव कार उलटून हा अपघात झाला आहे. मारुती सुझुकी अर्टिगा कारमधून १३ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर सात प्रवासी जखमी आहेत. मृतांमध्ये चार महिला, एक लहान मूल आणि चालकाचा समावेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना तातडीने मदत न मिळाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७.५५ वाजता लोणार तालुक्यातील मेहकरजवळ हा अपघात झाला. अर्टिगा कारमधून १३ जण प्रवास करत होते. ही कार उलटून अपघात झाला. अपघातानंतर पाऊण तास अपघातग्रस्तांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. त्यानंतर अधिकारी तिथे दाखल झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांनाच दमदाटी केली.
मदतीसाठी होतोय उशिर
अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येणार असल्याची ग्वाही सरकारकडून नागपूर अधिवेशनात देण्यात आली होती. मदतीसाठी संबधित विभागाला वाहनेसुद्धा उपलब्ध करून दिली गेली आहेत. मात्र, अजूनही वेळेत मदत मिळत नसल्याचा महामार्गालगतच्या गावांत राहणाऱ्या ग्रामस्थांचा दावा आहे. रविवारी झालेला अपघात बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर झालेला आतापर्यंतचा ४० वा अपघात ठरला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. अपघातानंतर पाऊण तास क्विक रिस्पॉन्स टीम किंवा इतर कुठलीही शासकीय यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.