मुंबई: विदर्भाच्या एका आमदाराच्या (MLA From Vidarbha) विधानाची चर्चा थेट दिल्ली, आसामपर्यंत (Delhi, Assam ) जाऊन पोहोचली आहे. त्यांच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत गोंधळही झाला. आसाममधील विरोधी पक्षांच्या आमदारांनी विदर्भातील आमदाराच्या अटकेची मागणीही करून टाकली. खरेतर हा संपूर्ण वाद कुत्र्यांशी संबंधित वक्तव्यामुळे सुरू झाला आहे. आपल्या परखड आणि स्पष्ट वस्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu ) यांनी हे विधान महाराष्ट्राच्या विधानसभेत केले होते. महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचे मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली, असे ते म्हणाले होते. आसाममधील आमदारांनी या विधानासाठी कडू यांचा निषेध नोंदवला आहे.
कडू यांच्या या वक्तव्याची माहिती आसामच्या विधानसभेतील सदस्यांपर्यंत जाऊन पोहोचली. यामुळे तिथले वातावरण तापले आहे. आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचे भाषणदेखील थांबवावे लागले होते. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आसामबद्दल इतके वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विरोधी पक्षातील आमदारांनी कडू यांना अटक करावी, अशी मागणी देखील केली आहे.
या वादानंतर खणखरपणे भूमिका मांडणारे कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कडू म्हणाले की, मला आसाम नव्हे तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागत असल्याचे सांगून त्यांनी वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता आसाममधील आमदार काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे