आरटीई पालकांची धाकधूक वाढली उद्या सोडत, अर्ज अधिक असल्याने चिंता

0

नागपूर. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत बुधवारी सकाळी 11 वाजता (Online draw on Wednesday) काढली जाणार आहे. यंदा नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले आहे. एका जागेसाठी जवळपास 6 दावेदार असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत पालकांची धाकधूक वाढली (Anxiety in parents) आहे. अर्ज कराणाऱ्या साऱ्यांचेच लक्ष सोडतीकडे लागले आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास 2023-24 या शैक्षणिक सत्रासाठी 653 शाळांमध्ये 6577 जागा राखीव आहेत. त्यासाठी सुमारे 36,500 अर्ज प्राप्त झाले आहेत. गतवर्षी 31,477 अर्ज प्राप्त झाले होते. त्या तुलनेत यंदा सुमारे 5,000 ची भर पडली आहे. शिक्षण आयुक्तांनी आरटीईबाबत सोमवारी आढावा घेतला. त्यात 375 बोगस अर्ज आढळून आले आहेत. त्यापैकी 161 अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगितले जाते. आता बुधवारी सकाळी पहिली सोडत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढली जाणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हीसीद्वारे करण्यात येणार आहे. त्याची लिंक पालकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुण्या पाठोपाठ नागपूर जिल्ह्यात अर्जांची संख्या सर्वाधिक आहे. अशात पालकवर्ग चिंतेत आहेत.

अंतराने वाढविले टेंशन
3 किमी क्षेत्रातील पाल्यांनाच शाळेत प्रवेश मिळणार असल्याचे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले. पण, अर्ज करताना तीन किमीहून अधिक लांब असणाऱ्या शाळांचे पर्याय दर्शविण्यात येत होते. नाईलाजाने पालकांनी ते पर्याय स्वीकारले. आता नंबर लागला तरी अंतराच्या कारणावरून प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक पालक टेंशनमध्ये असल्याचे दिसून येते.

प्रमाणपत्रांसाठी लगबग
आरटीईअंतर्गत नंबर लागल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून आवश्यक कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी पालकांचीलगबग सुरू आहे. उत्पन्नाचा दाखला तयार करून घेण्यासाठी पालकवर्ग प्रयत्नशील आहेत. अर्थात कमीतकमी उत्पन्नाचा दाखला मिळावा यासाठीच सारेच प्रयत्नशील आहेत. शाळेपासून घारचे अंतर अधिक असलेल्या पालकांना भाड्याचे घर घेतले असल्याचे दाखवावे लागणार आहे. भाडेकरार करून घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.