मुंबई: उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (War of words between Fadnavis & Thackeray) यांच्यावर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेनंतर या दोन नेत्यांमध्ये जोरदार वाक््युद्धाला सुरुवात झाली आहे. फडणवीस यांनीही त्याच शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेचे प्रकार केले असून प्रथमच या दोन नेत्यांमध्ये यास्तरावरील वाक््युद्ध दिसून आले आहे. “अडीच वर्षांचा त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके ‘फडतूस’ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला.( Roshni Shinde)रोशनी शिंदे यांना कथित मारहाण प्रकरणानंतर हा वाद निर्माण झाला आहे. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्यावर फडणवीसांनीही त्वरित प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे, असे त्यांना स्पष्टपणे सुनावले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या टिकेवर नागपुरात बोलताना फडणवीस म्हणाले, “त्यांचे दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. मंत्री जेलमध्ये गेल्यावरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका…हा त्यांचा थयथयाट आहे, त्याला उत्तर देण्याचे कारण नाही.”
“पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून निवडून येतात, खुर्चीसाठी लाळघोटेपणा करतात. खरा फडतूस कोण, हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते कोणत्याही भाषेत बोलले असले तरी मला त्यांच्यापेक्षा खालच्या भाषेत बोलता येते कारण मी नागपूरचा आहे. मी तसे बोलणार नाही. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलले पाहिजे…” असेही फडणवीस म्हणाले. “मी गृहमंत्री असल्याने अनेकांची अडचण होत आहे. ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण, मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. जो जो चुकीचे काम करेल, त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही” असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.