
बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या १३ व १४ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे आयोजित करण्यात येत आहे. निसर्गरम्य परिसरात, आदरणीय डॉ. बाबा आमटे यांच्या पावन भूमीत साहित्य संमेलनाचे आयोजन होणे ही साहित्यविश्वासाठी आनंदाची बाब मानली जात आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून अनेक कवी, कवयित्री, साहित्यिक संमेलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार असून, नांदेड येथील सुप्रसिद्ध गझलकार बापू दासरी यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे मुख्य अतिथी डॉ. मंदाकिनी आमटे, तर विशेष अतिथी नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी असतील.
दोन दिवसीय या संमेलनाच्या कार्यक्रमांतर्गत १३ डिसेंबर रोजी रात्री रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत विविध साहित्य कार्यक्रम, चर्चासत्रे आणि पुरस्कार वितरण होईल.
यामध्ये जीवनगौरव, समाजरत्न, समाजभूषण यांसारख्या महत्त्वपूर्ण पुरस्कारांचा समावेश आहे.
कार्यक्रमानंतर भव्य कविसंमेलन होणार असून सर्व सहभागी कवींचा सन्मानही करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरोज अंदनकर यांनी दिली.














