भटिंडातील लष्कराच्या छावणीत गोळीबार, ४ जवानांचा मृत्यू

0

भटिंडा : पंजाबमधील लष्कराच्या छावणीत बुधवारी पहाटे गोळीबाराची घटना उघडकीस आली. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ( Bathinda Military Station) या गोळीबारानंतर कन्टॉन्मेट परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात प्रवेश करण्यास कोणालाही मनाई करण्यात आली आहे. पहाटे ४.३५ वाजता अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये हा गोळीबार झाला. छावणीत सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला आहे की आपसातील गोळीबार हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे यासंदर्भात माहिती देणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत लष्कराकडून अहवाल मागवला आहे. पंजाब सरकारने भटिंडा पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे.

भटिंडा येथील लष्कराची छावणी ही आशिया खंडातील सर्वात मोठी लष्करी छावणी आहे. या मिलिटरी छावणीची हद्द सुमारे 45 किलोमीटर आहे. भंठिंडा मध्ये 10 कॉर्प्सचे मुख्यालय आहे. हे स्टेशन जयपूरच्या दक्षिण पश्चिम कमांडच्या अधिकार क्षेत्राखाली येते. येथील दारूगोळा डेपो हा देशातील सर्वात मोठ्या डेपोपैकी एक असल्याचे सांगितले जाते. लष्करी छावणीत सैनिकांची कुटुंबे राहतात. या घटनेनंतर लष्कराने सर्वांना आपापल्या घरात राहण्यास सांगितले आहे. कॅन्टोन्मेंटमधील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, लष्कराने पंजाब पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नाही. फायरिंग 80 मीडियम रेजीमेंट आर्टिलरी ऑफिसर्स मेसमध्ये झाली आहे. काही दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या खोलीतून एक असॉल्ट रायफल गायब झाली होती. कदचित त्याच रायफलने फायरिंग झाल्याची शक्यता आहे.

दहशतवादी हल्ला नाही

भठिंडाचे एसएसपी गुलनीत खुरूना यांनीही हा दहशतवादी हल्ला नसल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. सर्च ऑपरेशन सुरू असून परिसर सील करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.