विद्यापीठाचा 110 वा दीक्षांत सोहळा गुरुवारी

0

डॉ. टी. जी. सीताराम, राज्यपाल रमेश बैस यांची विशेष उपस्थिती

नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University ) 110 वा दीक्षांत समारंभ (110th Convocation) गुरुवारी 13 एप्रिलला दुपारी 2 वाजता सिव्हील लाइन येथील वसंतराव देशपांडे सभागृह होणार आहे. महामहीम राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस (Governor and Chancellor of the University Ramesh Bais ) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्याला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात होणारा हा सोहळा विशेष ठरणार आहे. एकूण 108 प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके या दीक्षांत समारंभात वितरित केले जाणार आहे. सोबतच 1,01,722 पदवीकांक्षी व 330 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. त्यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – 32,709, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – 27,925, मानव विज्ञान विद्याशाखा – 25,659, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – 8,077, स्वायत्त महाविद्यालयाच्या – 7,351 विद्यार्थ्याचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू संजय दूधे, कुलसचिव राजू हिवसे, प्रफुल्ल साबळे उपस्थित होते.

280 संशोधकांना आचार्य पदवी
दीक्षांत समारंभात 280 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत 97, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत 38, मानवविज्ञान विद्याशाखेत 113, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत 32 जणांचा समावेश आहे. या शिवाय गुणवंत ठरलेल्या एकूण 195 विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यात 157- सुवर्णपदके, 9 – रौप्यपदके व 29- रोख पारितोषिकांचा समावेश आहे.

दीक्षांत समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण
एकशे दहाव्या दीक्षांत समारंभाचे विद्यापीठ युट्यूब चॅनेल वरून दुपारी 2 वाजता ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण करणार आहे. यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव्ह बघण्याची सुविधा जगभरातील सर्व संबंधित विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होईल.