मुंबईः राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच अपेक्षित असताना संभाव्य घडामोडींची चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania Twit on Ajit Pawar)यांनी केला आहे. काही मुद्यांवर विरोधकांशी फारकत घेत वेगळी भूमिका घेतल्याने शरद पवार हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच आता अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.”
अंजली दमानिया म्हणाल्या की, काही बातम्याही अजित पवार आणि भाजपची जवळीक वाढत असल्याचे दाखवत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने अजित पवारांचे नाव वगळले आहे. त्यामुळे ते आता भाजपसोबत जातील असा माझा अंदाज आहे. मला हे सर्व राजकारण चुकीचे व घाणेरडे वाटते. असे राजकारण मला बघवत नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.
शिंदे गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याचाच संदर्भ देत 15 आमदार अपात्र होणार, असा दावा अंजली दमानिया केला आहे. शिंदे गटाचे 15 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकार अल्पमतात येईल व महाराष्ट्रासारखे मोठे राज्य गमावणे भाजपला परवडणारे नाही. अशात भाजप अजित पवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल, असेही दमानिया म्हणाल्या.