शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीट?

0

मुंबई MUMBAI _  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (AJIT PAWAR) हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) (SHIKHAR BANK) घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचेनाव नसल्याचे आढळून आले (Apex Bank Scam) आहे. त्यामुळे या घोटाळ्यात ईडीकडून त्यांना क्लिनचिट मिळाली की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. या घोटाळ्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या घोटाळ्याची चौकशी थांबली होती. सुमारे 25 हजार कोटींचा हा घोटाळा जूनमधील सत्तांतरानंतर या प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा वेग आाला होता. याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती, हे विशेष.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडेश्वर साखर कारखान्याचे बहुतांश शेअर्स स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीच्या नावावर आहे. ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. ईडीने या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पार्कलिंग सॉइल कंपनीचे नाव टाकले असले तरी अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे नाव घेतलेली नाहीत. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल आहे. त्यामुळे अजित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आतापर्यंत ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केलेली नाही.

अजित पवारांना क्लिनचीट?

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच त्यापार्श्वभूमीवरच ईडीने अजित पवारांना क्लीन चीट दिली का?, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. या प्रकरणाची येत्या 19 एप्रिल रोजी ईडीच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा अजून तपास सुरूच असल्याने गरज पडल्यास ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकते, असाही एक मतप्रवाह आहे. महाराष्ट्र राज्य सहाकरी बँकेने मनमानीने कर्ज वाटप केल्यामुळे या बँकेला 10 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप होता.