मुंबई MUMBAI – भाजप (BJP) आणि शिवसेनेत ( SHIVSENA ) आमच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप-शिवसेना युती घट्ट असून राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी हा दावा केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बहुमत चाचणी झाल्यास 184 मते पुन्हा मिळतील हा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे इतर कोणाचीही मदत घेण्याचा प्रश्नच येणार नाही. भाजप-शिवसेना युती घट्ट आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार. मात्र वैयक्तिक टिपाटिप्पणीला महत्त्व द्यायला नको. सभांमध्ये धोरणे मांडा, महाराष्ट्राचे व्हिजन मांडा. मात्र वैयक्तिक टिका करणाऱ्यांना भाजप निपटवण्यास सक्षम आहे. शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी दुप्पटीने मदत केली आहे, असे बावनकुळे म्हणाले. पंकजा मुंडे या यंदा पाथर्डीतून लढणार काय, या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, कोण कुठून लढणार, याबाबत मला अधिकार नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. त्यामुळे याबाबत काय बोलणार, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.