गांधी, गोडसे आणि सावरकर : एक त्रिकोण

0

स्व प्रदीप दळवी (PRADEEP DALVI) लिखित आणि स्व विनय आपटे ( VINAY APTE ) दिग्दर्शित ‘ मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक ३3 वर्षांपूर्वी प्रथम रंगभूमीवर आलं. (MAHARASHTRA)  महाराष्ट्रात या नाटकाचे चक्क ७५० प्रयोग झाले. महाराष्ट्रीय उच्चवर्णिय प्रेक्षक समोर ठेऊन केलेला हा प्रयोग होता. जो कमालीचा यशस्वी ठरला कारण महाराष्ट्रातील उच्चवर्गात गांधीजीबद्दल तथाकथित तिरस्कार आहे. शरद पोंक्षेनी नथुरामची भूमिका केली होती. नाटकाच्या सुरुवातीच्या स्वगतात गांधीहत्येनंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नथुरामला सावरकर पोलिसांबरोबरच दिसतात. नाटकात लिहिलेल्या प्रवेशानुसार नथुराम स्वगतात सावरकरांच्या पाया पडतो. आणि सावरकर त्याला ‘चिरंजीवी भव ‘ असा आशीर्वाद देतात.आणि आपल्या आशीर्वादाच्या पुष्टयर्थ सावरकर म्हणतात ‘जेव्हा जेव्हा गांधींचं नाव निघेल तेव्हा तेव्हा नथुराम गोडसे हेही नाव निघेल. आणि चिरंजीवी भव या आशीर्वादाचा अर्थ नामरूपाने नथुराम चिरंजीव राहील असा घेण्यास हरकत नाही. अर्थात असा प्रसंग घडला हे स्वगतरुपी संवादात नाटककारानी दाखवलं आहे. त्यांचं नाटक बऱ्याच प्रमाणात नथुराम गोडसे याचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे यांच्या ‘गांधीहत्या आणि मी’ या पुस्तकावर आधारित असून स्वतः गोपाळ गोडसेला गांधी हत्या प्रकरणात २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. माहितीनुसार आणि उपलब्ध फोटोनुसार गांधीहत्या खटल्यात आरोपी असलेले सावरकर खटल्यातील इतर कोणाही आरोपींशी बोलत नसत. आणि कोर्टात सर्वात शेवटच्या रांगेत बसत. मात्र इतर आरोपी आपसात बोलत असत. जर नाटकात लिहिलेल्यानुसार सावरकरांनी नथुरामला चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिल्याचं खरं मानलं तर ते वाक्य म्हणजे एक प्रकारे नथुरामच्या कृत्याला पोलिसांसमोर सावरकरांनी आशीर्वाद आणि पाठिंबाही दिला अस म्हटलं पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाने तर सावरकरांची गांधीहत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. आणि सावरकारांचा सर्व कृत्ये आपल्या सहकाऱ्याकडून करवून घेऊन स्वतः नामानिराळे राहण्याचा एकूण स्वभाव पाहता त्यांनी पोलिसांच्या समोर असा आशीर्वाद दिला असण्याची शक्यता नगण्य आहे. मग लेखकाने विचारस्वातंत्र्याचा फायदा घेत सावरकरांनी नथुरामला दिलेल्या आशीर्वादाची कपोलकल्पित कहाणी रचली की ती घटना म्हणजे दोन ओळींच्या मधील बाहेर न आलेल्या वस्तुस्थितीच दर्शन आहे. माझ्या दृष्टीने चिरंजीवी भव हा पूर्ण घटनेचा टर्निंग पॉईंट आहे. आज गांधीहत्येला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. गोडसेला फासावर लटकवून 73 वर्षे झालीत तर सावरकरांच्या मृत्यूला 67 वर्षे झाली आहेत. तरीही देशाच राजकारण या तीन परस्पर विरोधी व्यक्तींच्या भोवतीच घोटाळत आहे आणि पुढेही जाणीवपूर्वक तसच ठेवल जाईल. कारण राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर भाजपला कोणता तरी भावनिक मुद्दा हवाच! तो सावरकरांच्या रूपाने संघ परिवाराला मिळाला आहे.

गमतीची गोष्ट ही की संघ परिवाराला आज जरी सावरकर प्रेम उफाळुन वर येत असलं तरीही सावरकरांची हिंदुमहासभा असतानाही संघाने १९५२ साली जनसंघाची स्थापना केली होती, हे उल्लेखनीय . अर्थात सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व संघ परिवाराला चालणारं नव्हतं. आणि म्हणूनच जनसंघाची निर्मिती झाली. अगदी आज एकविसाव्या शतकात संघ परिवार गाय केवळ उपयुक्त पशु मानण्यास तयार नाहीत. सावरकर गायीला केवळ उपयुक्त पशू मानत. पूजनीय वगैरे शब्द त्यांना मान्य नव्हते. अर्थात संघ परीवाराला हे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व झेपणार नव्हतं. उपयोगिता नष्ट झालेल्या गोहत्येच ते समर्थन करीत. आणि नेमक्या याच मुद्द्यावर शरद पवार सावरकरांचे समर्थन करतात आणि राहुल गांधीच्या विधानातील चूक दाखवत नेहरू – गांधी परिवारासमोर आपल श्रेष्ठत्व दाखवतात आणि महाराष्ट्रात सावरकरांच्या चाहत्यांमध्ये स्वत: विषयीची चांगली भावना तयार करतात.

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना २००३ मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. महात्मा गांधींच्या तैलचित्राच्या अगदी समोर. एकेकाळी सावरकर स्व त: गांधी हत्येत आरोपी होते. भलेही त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. भारतीय संसदेच्या इतिहासात काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातलेला हा एकमेव समारंभ होता. हा विरोध केवळ राजकीय स्वरुपाचा नव्हता तर, स्वातंत्र्यचळवळीला विरोध करणाऱ्या सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यामागे होती. आणि आज केंद्रात भाजपच सरकार असताना एकीकडे सावरकरांना भारतरत्न केव्हा मिळणार हा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केला जातो. तर दुसरीकडे प्रश्न हा राहतो ज्यानी ब्रिटिश सरकारची माफी मागितली त्यांना मरणोत्तर भारतरत्न कसं मिळणार?

भोपाळच्या भाजप च्या खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्यातील एक प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंग यांनी तर गोडसेची भलामण करत त्याला देशभक्त म्हटल होत. तो देशभक्त होता की नव्हता हा प्रश्न नसून तो एक खुनी होता. गांधी हत्या होती, वध नव्हता, अस एक मतप्रवाह मांडला जातो.

गेल्या ७३ वर्षांपासून हिंदुत्ववादी ती ‘हत्या’ नसून ‘वध’ होता आणि तो वध काळाची आणि देशाची गरज होती हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे. हिंदू संस्कृतीत वध या शब्दाचा वापर राक्षसाला मारल्यानंतर केला जातो. जाणीवपूर्वक तो शब्द वापरून हिंदुत्ववादी गांधींची तुलना राक्षसाशी करतात. गांधीहत्येवरील गोपाळ गोडसेंचे पुस्तक याच प्रयत्नाचा भाग आहे. हा प्रयत्न अनेक कथा, कादंब-या, नाटके आणि चित्रपटातून केलेला आहे.

वि दा सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, पण त्यामागची कारणं बघा , असं लॉजिक हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रवक्त्यांकडून दिलं जातं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे भाजपचे आणि संघ परिवाराचे पाहिले असे नेते की ज्यांनी विनायक दामोदर सावरकरांनी माफी मागितली हे मान्य केलं. पण ते मान्य करत असतानाच त्यांनी त्या घटनेशी गांधींचं संबंध जोडण्याचा ‘हास्यास्पद’ प्रयत्न केला. अतार्किक युक्तिवाद करणे , हे संघ परिवाराच्या रक्तातच आहे. १९१०साली सावरकरांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्याआधीच सावरकरांच्या दोन भक्तांकडून म्हणजेच मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरे यांच्याकडून करझन वायली आणि नाशिक च्या कलेक्टर जॅक्सन यांची हत्या होऊन दोघांनाही फाशी देण्यात आली होती. सावरकरांनी शिक्षा मिळाल्यापासून स्वतः ला ‘prodigal son’ (वाट चुकलेला मुलगा)अस म्हणवून १९११ ते १९१३ साली माफीपत्रे दिली. माफी मागितल्यावर तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९१५ साली गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.त्यामुळे पहिल्या माफीपत्रांचा महात्मा गांधींशी सुतराम संबंध नाही. पण यातून एक सिद्ध होतं की
सावरकरांनी अनेक माफीपत्रे इंग्रज सरकारला पाठविली होती. खुद्द राजनाथसिंहांनीच तशी कबुली दिली होती. पण त्यांनी एक खोटेपणा केला आणि सांगितले की, गांधींच्या सांगण्यावरुन सावरकरांनी इंग्रजांची माफी मागीतली.

‘भारत जो डो यात्रेच्या दरम्यान

एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना असली वीर संबोधलं तर सावरकरांना माफीवीर संबोधलं ते याच माफीपत्रांना उद्देशून. सुरतला मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावर त्यांनी माफी का मागितली नाही, असे विचारलं असता, माझं नाव सावरकर नाही, तर गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली होती. भालाकार भोपटकर यांनी सावरकरांना वीर हे विशेषण वापरले. आता एका बाजूला सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणविणारा एक वर्ग आहे जो देशात सत्तेवर आहे तर दुसरीकडे त्यांच्या सहा माफीपत्राना उद्देशून त्यांना माफीवीर म्हणवणारा वर्ग विरोधात आहे.

सावरकरांनी माफी मागितली या पुराव्यांवर आधारित वस्तुस्थितीला जर मान्यता दिली तर हा प्रश्नच संपतो. पण ती वस्तुस्थिती मान्य करण्याची इच्छा अथवा हिंमत हिंदुत्ववाद्यांकडे नाही. आणि त्यामुळेच हा प्रश्न फोफावतो.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मागे लपण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
सावरकरांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन २८ मे १९७० रोजी इंदिरा गांधींनी
केलं होत सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिताना धाडसी (daring) असा उल्लेख त्यांनी केल्याच आता हिंदुत्ववादी सांगत आहेत.

सावरकर हे किती चतुरस्त्र बुद्धिमत्तेचे होते. सावरकरांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा लिहीली, मराठी १००००हून अधिक पाने व इंग्रजीत १५००हून अधिक पाने भरेल इतके लिखाण केले, याचाही उल्लेख केला जातो. आणि हे सगळं खरं आहे . जितकं हेही खरं आहे की सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली.

महत्वाची बाब अशी की हिंदुत्ववाद्यांना सुद्धा गांधींच नाव घ्यावं लागतच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिका भेटीत गांधींजींचाच दाखला द्यावासा वाटला . तिथे त्यांना हेडगेवार, गोळवलकर किंवा सावरकर आठवले नाहीत.

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमबद्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = ‘इति+ह+आस’ हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.

गांधी, गोडसे आणि सावरकर यांच्याविषयी घडलेल्या घटना जशाच्या तशा अभ्यासल्या तर गांधींची महानता, गोडसेचे अतिरेकी विचार, त्याचा सावरकरांशी असलेला संपर्क, आशिर्वाद आणि सावरकरांची माफीपत्रे स्वातंत्र्यचळवळीला विरोध करणारे सावरकर या गोष्टी उघड होतात. आणि या त्रिकोणाच गणित सहजगत्या सोडवता येत. अर्थात सोडवण्याची इच्छा असल्यास! तूर्तास इतकेच!

जयंत माईणकर, मुंबई