झाकली वज्रमूठ!

0

राज्यातील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. दावे- प्रतिदाव्यांचा फड रोजच रंगतो आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कती नसली तरी, युद्ध, प्रेम आणि राजकारणात सारेच माफ असल्याचा व्यवस्थित गैरसमज करून घेत सारा तमाशा चालला आहे. सत्ताधारी- विरोधकांची तोंडे दोन बाजुला आहेत. ते चालायचेच, पण प्रत्येकच घडामोडींवरून टोमणे मारणाऱ्या विरोधकांमध्येही एकवाक्यता दिसून येत नाही. राज्यात सध्या महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभा घेतल्या जात आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात पार पडली. दुसरी सभा नागपुरात १६ एप्रिलला होऊ घातली आहे. विरोधक एकसंघ असल्याचे या सभांमधून दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रत्यक्षात मात्र विरोधकांच्या मतांमध्येच विरोधाभास दिसून येतो. अदानी समूहात २० हजार कोटी रुपये गुंतवले गेले ते कुठून आणले, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय्. काँग्रेससह १९ अन्य पक्षांनी या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) करून घेण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. जेपीसीकडून चौकशीची गरज नसल्याचे सांगत पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला छेद दिला. त्यावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदानी समुहात एलआयसी, पीएफ, स्टेट बँकेचा पैसा बेकायदेशीरपणे गुंतविला गेल्याचा आरोप केला आहे. हा जनतेच्या कष्टाचा पैसा आहे. त्याचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे.

अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर जेपीसी चौकशीतूनच ते होऊ शकेल, असे ठाम मत त्यांनी मांडले. ठाकरे गटाने या मुद्यासंदर्भात काँग्रेससोबत राहणे पसंत केले. विरोधकंमधील वादाचा हा काही एकच मुद्दा नाही. वीर सावरकर यांच्यावरूनही काँग्रेसची वाट वेगळी आणि ठाकरे गट व राष्ट्रवादीचा विचार वेगवेगळा आहे. काँग्रेसने सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख कायम ठेवला आहे. तर, शरद पवार यांनी हा काही राष्ट्रीय मुद्दा नसल्याचे म्हटले आहे. ठाकरे गट मात्र सावरकर प्रखर राष्ट्रभक्त असून, त्यांचे योगदान कदापी विसरता येणार नसल्याचे सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरूनही विरोधकांमध्ये कमालीची मतभिन्नता आहे. मुद्यांवर एकवाक्यता नसलेले हे तिन्ही पक्ष वज्रमूठ सभेच्या निमित्ताने गर्दी जमवून एकजूट दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते जनतेच्या किती पचनी पडते ते निवडणुकीत पडणाऱ्या मतांवरूनच स्पष्ट होऊ शकणार आहे. त्यासाठी २०२४ उजाडण्याची वाट बघावी लागणार आहे. तुर्तास, राजकीय परिस्थिती आणि आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी एन्जॉय करा…कारण तेवढेच आपल्या हाती आहे.