गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती, सतर्कतेचा इशारा

0

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. (Flood Situation in Gadchiroli and Chandrapur District) गडचिरोलीचा दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आठ प्रमुख मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, मुलचेरा धानोरा, चामोर्शी, अहेरी, आलापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे आता नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. सतत होत असलेल्या पावसामुळं गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ते मुलचेरा मार्ग, खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली, एटापल्ली मार्ग, बोलेपल्ली मार्ग, पावीमुरंडा मार्ग, चामोर्शी ते माक्केपाली आणि आलापल्ली ते भामरागड हे मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. विदर्भातील गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याने पावीमुरांडा-पोटेगाव मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. येत्या २४ तासांत विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावली तालुक्यात 143 मिमी, नागभीड तालुक्यात 123 मिमी, ब्रम्हपुरी 85 मिमी, सिंदेवाही तालुक्यात 70 मिमी तर पोंभूरणा तालुक्यात 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.