
नागपूर – वसंतराव देशपांडे सभागृहात 15 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता समिधा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक राज्यस्तरीय ‘फ्लोरा आणि फौना’ फॅशन शोचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा भारती वाकडे यांनी आपल्या संकल्पनेतून वर्षभर विविध कार्यशाळा आयोजित करून गृहिणींना आणि मुलांना फेविक्रिल रंगांनी विविध वेशभूषेवर आकर्षक रंगकाम शिकवले जाते, गेली 7 वर्षे भारती हा उपक्रम राबवून गृहिणींना जोडण्याचे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करत आहे. यंदा निसर्गावर आधारित सादरीकरणात सर्व महिला, मुली आणि लहान मुलांनी विविध वेशभूषेवर साकारलेल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आणि जवळ जवळ प्रत्येक सादरीकरणावर टाळ्या वाजवून फॅशन शोचा आनंद लुटला.
यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राहुल श्रीवास्तव, माजी नगरसेविका प्रगती पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक मृणालिनी वंजारी, वैशाली चोपडे, आरजे निशा, रिजवान खान, डॉ.संदीप बंडे, पांडुरंग वाकडे पाटील, देविदास मुके, शैलेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांनी या अभिनव उपक्रमांचे यावेळी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य प्रवीण खसाले, तृप्ती भोयर, अश्विनी साबले, सचिन जाधव, काजल तोतलानी, मृणाल गाडगे, पल्लवी साने, आणि रीता ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले. मोहम्मद सलीम यांनी मंचाचे यशस्वी संचालन व काही गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.