अवघा देश फणफणला फ्लूच्या साथीने वाढविली डोकेदुखी : आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना

0

 

दिल्ली. गत २-३ महिन्यांपासून अवघ्या देशभरातच ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आता तर कोरोनाप्रमाणेच लक्षणे असलेले रुग्ण घरोघरीच आहेत. अवघा देश आजाराने फणफणला आहे (whole country is ravaged by disease). उपचार घेऊनही ५ ते ७ दिवस फ्लूच्या त्रासापासून आराम मिळत नाही. अनेक प्रकरणांमध्ये रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात दाखल करण्याची (admitted to the hospital ) वेळ येत आहे. हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचे आणि ‘फ्लू ए’चा उपप्रकार ‘एच३एन२’ या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. आयसीएमआरने आजार टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत. त्यावर उपचार करताना सरसकट प्रतिजैवकांचा वापर करू नये आणि डॉक्टरांनी सध्या फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत असा सल्ला, वैद्यकीय संघटनांनी दिला आहे.
विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा श्वसनाशी संबंधित हा आजार पसरतो आहे. त्यावर विविध विषाणू प्रयोगशाळांच्या माध्यातून लक्ष ठेवले जात आहे. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होतो आणि ताप येतो, असा निष्कर्ष १५ डिसेंबरपासून करण्यात आलेल्या पाहणीवरून काढण्यात आला आहे. हा आजार जीवघेणा नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले असले आहे. सोबतच खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
हे टाळा
हा आजार टाळण्यासाठी कोरोनाच्या वेळी वापरलेली त्रिसूत्री उपयुक्त आहे. हस्तांदोलन करू नये, स्पर्श टाळावा. गर्दीत जाणे टाळावे. स्वच्छता पाळावी, मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. स्वत:हून औषधे घेऊ नयेत.
आजाराची लक्षणे
सर्दी, खोकला आणि कधी जोडीला ताप. मळमळ, उलट्या, घसादुखी, अंगदुखी, अतिसार. ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो.