नमामि चंद्रभागा’ योजनेला गती देणार : सुधीर मुनगंटीवार

0

 

°| वेदांत केसरी गुरूवर्य रंगनाथ महाराजांवर टपाल तिकीट काढणार

°| वेदांत केसरी गुरूवर्य रंगनाथ महाराज यांच्या जन्मस्थळाचा विकास करणार

पंढरपूर दि. 03 मार्च 2023 :-

अध्यात्मिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्वाची असणारी चंद्रभागा नदी स्वच्छ व निर्मळ होणे गरजेचे आहे. यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर राज्यात नमामि चंद्रभागा अभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानाला आता गती देण्यात येणार असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वेदांत केसरी गुरूवर्य रंगनाथ महाराजांवर टपाल तिकीट काढण्याचे तसेच त्यांचे जन्मस्थळ असलेल्या सोनपेठचा विकास करण्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.

आर्यवैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठ्ठल- रुक्मिणी व वेदांत केसरी ब्रम्हीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, किसन महाराज साखरे, जयवंत महाराज बोधले, नंदकुमार गादेवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान ही वारकऱ्यांसाठी पर्वणी असते. चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तिच्या उगमापासून पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदी काठ स्वच्छ राहावा, सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यादृष्टीने कामे केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांचे जन्मस्थळ असलेल्या सोनपेठ (जि. परभणी) या ठिकाणाचा विकास करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. वेदांत केसरी गुरूवर्य श्री रंगनाथ महाराज यांचे टपाल तिकीट काढण्यात येईल असेही ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी घेषित केले. या टपाल तिकिटाचे लोकार्पण सोनपेठ किंवा परभणी येथे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री संत साधू महाराज सेवा समिती मठास भेट देवून मठात भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

000000

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा