पोलिसांच्या मारहाणीत बाजार समितीचे माजी सभापती जखमी

0

 

चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीने वातावरण तापले

गडचिरोली (Gadchiroli). अऩेक जिल्ह्यांमध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे वार वाहताहेत. यानिमित्ताने राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही गडचिरोली, चामोर्शी (Chamorshi), अहेरी (Aheri), आरमोरी (Armori), सिरोंचा (Sironcha) या बाजार समित्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. चामोर्शी येथील कृषी बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तनाव शिगेला पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातच बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार (Atul Ganyarpawar) यांना नाकाबंदी दरम्यान बेदम मारहाण करकण्यात आली. पोलिस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा त्यांचा आरोप आहे. २० एप्रिल रोजी पहाटे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मारहाण इतकी जोरदार होती की गण्यारपवार यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चामोर्शीत सर्वपक्षीय विरुद्ध अतुल गण्यारपवार अशी लढत आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मतदारांना ट्रॅव्हल्समधून एकत्रितपणे ते कोठेतरी पाठवित असल्याची त्यांच्याविरुद्ध तक्रार होती. चामोर्शीच्या पोलिस निरीक्षकांनी बुधवारी गण्यरपवार यांना वारंवार फोन करुन ठाण्यात येण्यास सांगितले होते. मात्र ते आले नाहीत. २० रोजी पहाटे नाकाबंदीवेळी पोलिस निरीक्षक आणि गण्यारपवार यांची भेट झाली. यावेळी खांडवे यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात गण्यारपवारांचा डावा हात फ्रॅक्चर असून गळ्यालाही मार आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गडचिरोलीचे पो.नि. अरविंदकुमार कतलाम (Arvindkumar Katlam)यांनी गण्यारपवार यांचा जबाब नोंदवला आहे.

एकेकाळी आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmraobaba Atram )यांचे खंदे समर्थक असलेले गण्यारपवार नंतर त्यांच्यापासून दुरावले. सध्या ते शेतकरी चळवळीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. गतवेळी सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित त्यांनी बाजार समितीत मुसंडी मारली होती. पाच वर्षे सभापतीपद भूषविल्यानंतर आता पुन्हा ते मैदानात उतरले आहेत. यावेळी देखील सर्वपक्षीय पॅनलसमोर ते एकटेच खिंड लढवित आहेत. चामोर्शी परिसरात त्यांचे वलय असून जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे.