बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यात खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव सकर्शा गावाजवळ विचित्र अपघात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास (Buldhana Road Accident) घडली. या अपघातात तिघे जण जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोरच्या एका कारला धडक दिली. त्याचवेळी दुचाकीस्वरांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाठीमागून येणारी दुसरी कार उलटली. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा आणि कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुलडाणा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इरफान हुसेन, सचिन नहार आणि लक्ष्मण गवई हे तिघे जण सुसाट वेगाने दुचाकीवरून जात होते. रस्त्यात दुचाकीस्वार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरील एका कारला जाऊन धडकली. मात्र, दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाने दुचाकीस्वरांना वाचवण्याचा कार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार वेगात असल्याने उलटली व त्यातील एका जणाचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमीस अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.