संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार, नितेश राणेंचा खळबळजनक दावा!

0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे 10 जूनपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा असा खळबळजनक दावा भाजप नेते व आमदार नीतेश राणे यांनी केला (MP Sanjay Raut may join NCP) आहे. खासदार राऊत हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेटच होऊ देत नाहीत. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा राऊतांचा कट असल्याचा दावाही राणेंनी केला आहे.
आमदार राणे यांनी सांगितले की, अजित पवार राष्ट्रवादीबाहेर गेल्यावर आपण राष्ट्रवादीत प्रवेश करु, असे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांच्या बैठका देखील पार पडलेल्या आहेत, असे नितेश राणे यांनी सांगितले. बिकेसीमध्ये होणारी महाविकस आघाडीची शेवटची सभा असेल, असे मी यापूर्वीच सांगितले होते. त्यावेळी माझी माहिती गांभीर्याने घेण्यात आली नव्हती. काहीच दिवसांत महाविकास आघाडीकडून सभा रद्द करण्यात आल्या. आता आपले संजय राऊत यांच्याबद्धलचे भाकितही खरे ठरणार आहे. ते 10 जून किंवा त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी सर्वांनी फोन करून पवारांना राजीनामा न देण्याचा आग्रह धरला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांचाशी संपर्क केला नाही. उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटायला जाणार होते. परंतु, संजय राऊत यांनी ती भेट होऊ दिली नाही, असा दावाही नितेश राणे यांनी केलाय.