घुमर, कठपुतली नृत्याने जिंकली रसिकांची मने

0
नागरिकांचा महिला उद्योजिका मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर (Nagpur), ता. ७: नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात शुक्रवारी ७ मार्च रोजी नृत्य रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या नृत्य रंग कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका श्रीमती चेतना टांक यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपा समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, श्री.समीर पंडित, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.
यावेळी चेतना टांक म्हणाल्या की, सर्व बचत गटातील महिलांकरिता महिला उद्योजिका मेळाव्याचा माध्यमातून चांगली संधी उपलब्ध करण्यात आली आहे. एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे महिलांना मदत होईल. मेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांनी मनपाचे कौतुक केले आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यांनतर ‘कान्हा सो जा जरा…’ यावर सचिन डोंगरे आणि समूह यांनी नृत्य सादरीकरण केले. त्यानंतर ‘तरणा’ आणि ‘त्रिवट’चे सादरीकरण करण्यात आले. पुढे, शिववंदना, ताल रूपक, अष्टपदी, होरी, चतुरंग यांचे सादरीकरण अवंती काठे, प्राजक्ता चौधरी, राधिका साठे यांच्या ग्रुपने सादरीकरण केले. त्यांना सलोनी सालेम, रूद्राणी जोशी, सारा कोलारकर, नारायणी झलके, आकांक्षा देशमुख, गौरी कुलकर्णी, संमती अडावडकर, अहिषा काकडे, मृण्मयी चाफले, जानवी खेमका, संमती अडावडकर, अहिषा काकडे, आरोही सावरकर, स्निग्धा राऊत, काव्या बगाडिया, पाश्वी खोडके यांची साथ मिळाली. यानंतर लावणी, कोळी नृत्य, घुमर नृत्य, कठपुतली नृत्य यांचे सादरीकरण सचिन डोंगरे आणि समूह यांनी तर गणेश पंचरत्नंम या भरतनाट्यम आणि थंगरम तसेच ताल आणि बोलावर नृत्य चे सादरीकरण पूजा हीवर्डे त्यांनतर आणि रागमालिका आणि आदितालात बांधलेला चे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी नृत्यरंगाला सिकांनी भरभरून दाद दिली. संचालन आणि आभार प्रदर्शन वृषाली देशपांडे केले. शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये ‘फॅशन शो’ आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये ९ मार्च रोजी हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आले आहे. १० मार्च रोजी श्री. राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसेच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर केले जाईल. ११ मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात येणार आहे. ११ मार्च रोजी महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप होईल.