मुंबई: सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाला असल्याने नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले. या निर्णयामुळे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळू शकेल.
गेल्या महिन्यात यासंदर्भात मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता. त्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुखयमंत्र्यांनी आज दिलेत.
काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळेही शेतपिकांचे नुकसान होते, मात्र याठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे अतिवृष्टीची नोंद नसल्याने या शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. या शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक असल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत सततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नसल्याने आणि ती निश्चित करणे आवश्यक असल्याने, शेती पिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता शासनाकडे आलेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने समिती नियुक्ती करण्याबाबत निर्णय झाला होता.