अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, विरोधकांची मागणी

0

मुंबईः अवकाळी पावसाने राज्याच्या अनेक भागात शेतीचे नुकसान झाले. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारला केली. तर शेतकऱ्यांना पूर्ण मदत दिली जाईल, अशी ग्वाही सरकारच्या वतीने देण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला असून विरोधकांनी कामकाजापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत नुकसान भरपाईची मागणी केली (Opposition demands relief for farmers). शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, अंबादास दानवे, बंटी पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यानंतर विधानसभेतही या नेत्यांनी ही मागणी केली.
विधानसभेत आज केवळ अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आमदार नाना पटोले यांनीी विधानसभेत सांगितले की, शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झाले. यापेक्षा मोठे काय होऊ शकते? हे सगळे कामकाज बंद करायला पाहिजे. आज सरकारची शेतकऱ्यांबाबत भूमिका काय आहे? मागील आठवड्यातही कांदा-कापूस शेतकऱ्यांच्या प्रश्न समोर आला होता, असेही पटोले म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, राज्यात किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याविषयी माहिती मागितली आहे. पंचनाम्यानंतर तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागवले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.