नागपूर : आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवून देणा-या दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्त साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विदर्भातील जुन्या नव्या पँथर्सना / कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी पँथरच्या पुनर्गठनाची प्रक्रिया जोरात सुरु झाली आहे.
नुकतीच नागपूर येथील रविभवनात नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरिता बैठक झाली. या बैठकीत पँथरच्या पुनर्गठनामागील भूमिका जाहीर करण्यात आली. अर्थातच चार दशकांपूर्वी दलित, पीडितांवरील अन्याय, अत्याचाविरोधात डरकाळी फोडणाऱ्या दलित पँथरचे पुनर्गठन जुन्या-नवीन कार्यकर्त्यांना उत्साह देणारे ठरेल असे बोलले जात आहे. याचदृष्टीने येत्या २७ मार्च रोजी वर्धा येथे अधिवेशन आयोजित केले आहे. यात विविध ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा करण्यासोबतच भविष्याची दिशा ठरविली जाणार आहे.
रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पैंथरचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या समर्थकांचा विश्वास उंचावला आहे. त्यांचे या चळवळीस समर्थन लाभणार असले तरी इतर नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. विदर्भाचे मुख्य संयोजक अशोक मेश्राम यांनी जुन्या-नवीन पँथरची रविभवनात बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी आर. एम. पाटील, आर. एस. वानखेडे, राजन वाघमारे, प्रा. विनोद राऊत, डॉ. मनोज मेश्राम, संघरक्षित कांबळे, पुंडलिक तायडे, डॉ. भीमराव मस्के, डॉ. संदीप सपकाळ, भूषण सोमकुंवर, हेमराज टेंभुर्णे, हरीश लांजेवार आदी उपस्थित होते. पँथरची भूमिका कशी असावी, यावर अधिवेशनात चर्चा करून अजेंडा तयार करण्यात येईल. कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देता निवडणुकीपासून अलिप्त राहावे, अशी पँथरची तूर्तास भूमिका आहे. समाजासमोरील विविध प्रश्नांविरोधात पँथरचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. व्यवस्थेविरुद्ध लढा देतील. पँथर एका गटाची नाही तर, सर्वांसाठी खुली असून रिपब्लिकन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पॅंथरमध्ये सहभागी व्हावे. ही बिगर राजकीय संघटना असल्याने कोणताही राजकीय पक्ष व रिपब्लिकन गटाच्या दावणीला बांधली जाणार नाही, असे अशोक मेश्राम यांनी स्पष्ट केले.