नागपूर : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे 25 सशस्त्र तरुण दाखल झाले असून ते मोठा धमाका करू शकतात. याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता धर्मेंद्र यांची निवासस्थाने बॉम्बने उडवून दिली जाऊ शकतात अशी धमकी नागपूर पोलिसांना आल्यानंतर नागपूर ते मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे . मुंबई पोलिसांनी नागपूरच्या आणि सध्या तिकडे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. डायल 112 वरून मुंबई पोलिसचा कोळ नागपूर पोलिसांना डायव्हर्ट झाल्याने हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना या प्रकारची धमकी आल्याने पोलीस कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहर पोलीस कंट्रोल रूमला या प्रकारचा एक फोन आज मंगळवारी आला. या फोनवर उद्योगपती मुकेश अंबानी ,महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता धर्मेंद्र यांची निवासस्थाने उडवून देण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. या सोबतच सशस्त्र तरुण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दहशतवादी कारवाईसाठी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. तातडीने हा संदेश मुंबई पोलिसांना नागपूर पोलिसांनी दिला. आता या आलेल्या फोनची चौकशी सुरू असून अज्ञात आरोपीचा कॉलर आयडीमार्फत सुगावा लावण्याचे कामी पोलीस यंत्रणा लागली आहे.