200 एकर परिसरात गडचिरोली जिल्ह्यात होणार गोंडवाना विद्यापीठ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

0

राष्ट्रपतींना देणार निमंत्रण चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यात २०० एकरमध्ये गोंडवाना विद्यापीठाची भव्य वास्तू उभारण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा (फॉरेस्ट ॲन्ड ट्रायबल युनिव्हरसिटी) दर्जा देण्याबाबतचे विधेयक जुलै महिन्यात आणणार असल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर येथील वन अकादमीतील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली. गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात काम पूर्ण होत आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०० एकर विस्तीर्ण परिसरात गोंडवाना विद्यापीठाची भव्य वास्तू उभी राहणार आहे. विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार आहे. या विद्यापीठात या भागातील विस्तीर्ण जंगल,स्थानिक आदिवासी, जंगलात वास्तव्य करणारे वाघ, बिबट तथा विविध वन्यप्राणी व जंगल आणि आदिवासी व आदिवासी संस्कृति यावर अभ्यास केला जाणार आहे.
मार्च महिन्यातच या विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही असेही त्यांनी सांगितले. हे प्रस्तावित वन व आदिवासी विद्यापीठ जागतिक दर्जाचे राहणार आहे. विविध विषयांवरचा अभ्यास या ठिकाणी करता येणार आहे. या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून अतिशय उत्तम दर्जाचे हे विद्यापीठ व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. आज जिथे हा कार्यक्रम होत आहे त्या वन अकादमीच्या धर्तीवरच गोंडवाना विद्यापीठातील हे वन व आदिवासी विद्यापीठ राहणार असल्याचेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा