जल अभ्यासक प्रवीण महाजन
पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी पाण्याची आवश्यकता (Water requirement for drinking, agriculture and industries) असते, हे तर जगजाहीर आहे. त्याही बव्हतांश ठिकाणी पाणी वापराचा प्राधान्यक्रमही स्थानिक सरकार, प्रशासनाने पिण्यासाठी, शेती, उद्योग असाच ठरवला आहे. पण काही उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. विशेषतः दारू, बिअर तयार करणाऱ्या उद्योगांची गणना यात प्रामुख्याने होत होती. अलीकडे आरओ मशीन्स (RO Machines) द्वारे जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेतही पाण्याचा वापर आणि अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप होत असताना, एकट्या गूगल कंपनीला त्यांचे मोठमोठे सर्वर्स आणि डाटा सेंटरचे (Servers and Data Centers) वातावरण थंड ठेवण्यासाठी जेवढे पाणी दररोज लागते, तेवढ्या पाण्याने सुमारे तीस ते पन्नास हजार लोकसंख्येच्या गावाची पाण्याची गरज भागू शकते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ओरोगोनियन (Orogonian) नामक एका संस्थेने अमेरिकेतील डेल्स शहराच्या प्रशासनाला गूगल कंपनीच्या डाटा सेंटर्सला लागणाऱ्या पाण्याबाबतच्या वस्तुस्थितीबाबत विचारणा केल्यावर बराच काळ तर त्या प्रशासनाने टाळाटाळ करण्यात घालवला. पण अगदीच नाईलाज झाला तेव्हा त्यांनी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. संपूर्ण जगाला हादरायला लावणारी ही आकडेवारी ठरली आहे.
गूगल ही जगाला सर्च इंजिन सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. त्याच्या जगभरातील शाखा कार्यालयांना अक्षरशः अरबो लीटर पाणी लागते. गूगल व्यतिरीक्त अजूनही शेकडो कंपन्या विश्वात आहेत, ज्यातील काही कंपन्या इंटरनेट सेवा पुरवतात, काही साॅफ्टवेअर कंपन्या आहेत, काही टेक्नाँलॉजी कंपन्या आहेत. यातील सर्वांचेच स्वतःचे सर्वर्स आहेत. मायक्रोसॉफ्ट, ॲपल, आयबीएम, ओरॅकल, एसएपी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, काॅग्निझंट,(Microsoft, Apple, IBM, Oracle, SAP, Tata Consultancy, Infosys, Cognizant) या सारख्या लक्षावधी छोट्या मोठ्या कंपन्या जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. जिओ, व्होडाफोन, आयडिया, एटी ॲण्ड टी, ल्युमन टेक्नॉलॉजी या सारख्या इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्या देखील आहेत. मोठमोठे डाटा सेंटर्स असलेल्या या कंपन्यांकडे असलेल्या सर्वरची संख्याही लाखांच्या घरात आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत जगातील एकूण सर्वर्सची संख्या सुमारे नऊ कोटींच्या दरम्यान होती. यंदाच्या वर्षात सर्वर्सची ही संख्या चौदा कोटी एवढी झाली आहे. पुढील पाच वर्षांत ही संख्या अजून वाढणार आहे. यातील पन्नास टक्क्यांहून अधिक कंपन्या एकट्या अमेरिकेत आहेत.
एका आकडेवारीनुसार मागील वर्षी विविध टेक्नॉलॉजी कंपन्यांनी सर्वर थंड ठेवण्यासाठी सुमारे चार अरब गॅलन पाणी वापरले गेले. यातील ३.३ अरब गॅलन पाणी अमेरिकेत वापरले गेले. उर्वरीत ९७ कोटी गॅलन पाणी अन्य देशांत वापरले गेले.
अमेरिकेत मागील सुमारे दीड वर्षांपासून अमेरिकेत एका मुद्यावर वाद सुरू आहे. डेल्स शहराच्या नागरिकांना करावयाच्या पाणी पुरवठ्यापैकी एक चतुर्थांश वाटा एकट्या गूगल कंपनीला दिला जातो, असा तेथील नागरिकांचा आक्षेप आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याने नागरिक संतापले आहेत. पण, या निमित्ताने जगजाहीर झालेली पाणी वापराची आकडेवारी, चकीत करणारी आहे. इंटरनेट जगाची गरज होऊ लागले असताना, प्रचंड वीजेची गरज असलेले त्यांचे डाटा सेंटर्स थंड ठेवण्यासाठी लागणारी पाण्याची गरज जगासमोरची नवीन गरज ठरते आहे. लोकांच्या नित्य गरजेचे पाणी, पाणी वापराचा प्राधान्यक्रम बदलून, गूगलला देण्यावर जनतेचा आक्षेप आहे. अर्थात, गूगलसह असंख्य तंत्रज्ञान आणि साॅफ्टवेअर कंपन्यांनी अलीकडे या कामी समुद्राच्या पाण्याचा वापरही सुरू केला आहे. आजघडीला विविध समुद्रात चारशेपेक्षा अधिक सबमरीन ऑप्टिक केबल्स पसरले आहेत. पण सध्याच्या पाच लाखांच्या संख्येतील आणि २०२७ पर्यंत दुप्पट संख्येत असतील अशा कंपन्यांची पाण्याची गरज भागविण्याचे आव्हान वेगवेगळ्या देशासमोर उभे ठाकले आहे. ११ ते २० दशलक्ष लिटर पाणी लागणारे अनेक सेंटर्स आहेत. भविष्यात ही संख्या अजून वाढणार आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्याची मोठीच समस्या निर्माण होऊ घातली आहे.
दिवसभर इंटरनेटचा वापर करणाऱ्या जनतेला कल्पनाही नसेल या परिस्थितीत सध्या संपूर्ण विश्व आहे. इथे प्यायला पाणी पुरत नाही, पण कोट्यवधी जनतेच्या वाट्याचे पाणी इंटरनेट सुविधा स्वस्थ ठेवण्यासाठी वापरले जाते. यावर पर्याय तर शोधावेच लागतील….