सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

0

 

बुलढाणा : राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिल्यानंतर बळीराजा हबकून गेला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात पाहणीसाठी पोहोचले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली. चितोडा आणि हिंगणा कारेगाव येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा, तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,यावेळी खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचीही उपस्थिती होती.