नागपूर : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात पदवीधर व शिक्षकांनी भाजपला दणका दिलाय. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपसमर्थित नागो गाणार यांना शिक्षक मतदारांनी पराभवाचा धक्का दिला. तर अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील हे पिछाडीवर असून महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे हे त्यांच्यावर अनपेक्षित आघाडी घेऊन आहेत. नागपुरात पहिल्या फेरीतच महाविकास आघाडी समर्थित विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी तिसऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या गाणारांचा सात हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र, शिक्षक मतदारांनी भाजपवर रोष व्यक्त करीत महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान टाकले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भाजपकडून स्पष्ट आश्वासनाच्या अभाव आणि गाणारांबद्धलच्या एकूणच नाराजीचा फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाल्याची माहिती आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची ही जागा मागील दोन टर्मपासून भाजपकडे होती. पदवीधर मतदारसंघासोबतच आता शिक्षक मतदारसंघही भाजपच्या हातून निसटल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, नागपुरातील पराभवास जुन्या पेन्शनचा मुद्दा कारणीभूत ठरल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना मान्य केले आहे.
अमरावती
अमरावती पदवीधर मतदार संघातही भाजपसाठी चांगली बातमी नाही. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील हे पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे त्यांच्यावर आघाडी घेऊन आहेत. दोन फेऱ्यांची मतमोजणी पार पडली असून आगामी काही फेऱ्यांमध्ये चमत्कारच भाजपला वाचवू शकेल, अशी परिस्थिती दिसत आहे.
औरंगाबाद
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यावर आघाडी घेऊन आहेत. अपक्ष उमेदवार विश्वासराव सूर्यकांत हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
नाशिक
विधान परिषदेच्या रणधुमाळीत प्रचंड गाजलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे बाजी मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांच्यावर ७ ते ८ हजार मतांची आघाडी घेतल्याची माहिती आहे. या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जात असून ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार की कसे याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. तांबे यांना पक्षात घ्यायचे की नाही, याचा निर्णय पक्षनेतृत्वच घेईल, अशी नरमाईची भाषा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सुरु झाली आहे.
कोकण
दरम्यान, कोकण कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी महाविकास आघाडी समर्थित शेकापचे बाळाराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.