
मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. त्यामुळे हा महाराष्ट्रातील (maharashtra) एक महत्त्वाचा सण मानला जातो. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा (gudipadwa)साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा २२ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केलं जाते. गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. यानिमित्ताने पारंपरिक वेषभूषा देखील केली जाते. सार्वजनिक स्वरुपातही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने सार्वजनिक ठिकाणांवर नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देणाऱ्या रांगोळ्या काढल्या जातात. कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. नववर्षाची शोभायात्रा देखील काढली जाते.
गुढीची उभारणी
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. एक उंच काठी स्वच्छ धुवून तिला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, गाठीची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दर्शनी भागात गुढी उभारण्यात येते. तिच्यापुढे रांगोळी काढून तिची पूजा केली जाते. यानिमित्ताने घरातील सदस्य पारंपरिक वेशभुषेत असतात. महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.
गुढीपाडव्याचे प्राचीन संदर्भ
गुढीपाडवा का साजरा केला जातो, यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. तो दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा व्हावा, असे मानले जाते. याशिवाय देखील अनेक पौराणिक कथा गुढीपाडव्याशी जुळलेल्या आहेत. गुढीपाडव्याचा इतिहास शालिवाहन राजवटीशी संबंधित आहे. शालिवाहन राजाने शालिवाहन शकास सुरूवात केली आणि या शकाची सुरूवात म्हणजेच गुढीपाडवा होय.
वसंताचे आगमन
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. याच कालावधित पानगळ होऊन नव्या पालवीला सुरुवात होते. आंब्याला मोहोर आलेला असतो. त्यामुळे त्याचे प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधण्याची परंपरा आहे. गुढीसोबत कडूलिंबाच्या पानांची डहाळी देखील लावली जाते. या दिवशी चैत्र ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून त्याचे सेवन केले जाते. पाचनक्रिया सुधारण्यासह पित्ताची समस्या यामुळे दूर होण्यास मदत होते. त्वचेच्या आजारावरही ते गुणकारी ठरते. कडुनिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदात याला मोठे महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
गुढीपाडवा महाराष्ट्रात अधिक प्रमाणात साजरा होत असला तरी भारतातील विविध भागांत देखील हा सण साजरा केला जातो. इतर राज्यांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत, नाव व संदर्भ वेगळे आहेत. आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये याच दिवशी उगादी नावाने सण साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अत्यंत आनंदाने दक्षिण भारतीय नागरिक हा सण साजरा करतात.(Although Gudhipadwa is more widely celebrated in Maharashtra, this festival is also celebrated in various parts of India. Other states have different ways, names and contexts to celebrate this festival. Andhra Pradesh and Karnataka )