मुंबई : खलिस्तानी समर्थक नेता अमृतपाल सिंग (Amritpal Sing) याला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांची पथके राज्यभर शोधमोहिम राबवित आहे. फरार झालेला अमृतपाल सिंग हा नांदेडमध्ये येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आल्याने महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आले (Nanded Police on Alert) आहेत. नांदेड पोलिसांना यासंदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर असणार आहे. नांदेड शहरात पंजाबमधून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते. त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडला येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अलर्ट राहीर करण्यात आला आहे. बाहेरून जे लोक नांदेडमध्ये येतात त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत.
पंजाबमध्ये पुन्हा फुटीरतावादी चळवळ उभारण्याचे अमृतपाल सिंग याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी त्याने सशस्त्र दल उभारण्याचेही प्रयत्न केले आहेत. गेल्या महिन्यात पंजाबमधील एका पोलिस ठाण्यावर सशस्त्र हल्ला प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. शनिवारपासून पंजाब पोलीस अमृतपालचा शोध घेत आहेत. मात्र, तो पोलिसांना हुलकावणी देत असल्याचे दिसत आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकार लगावली आहे.