1.21 कोटींचा औषधसाठा जप्त : 295 मेडिकल स्टोअर्सला कारणे दाखवा नोटीस
नागपूर. नियमांचा भंग करून औषधविक्री (Illegal sale of drugs ) करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration ) कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूर जिल्ह्यात सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. एमटीपी किटची अवैधरित्या विनाबिल अधिक पैसे घेऊन विक्री करणे, विनापरवाना औषधांचा साठा, बोगस डॉक्टरच्या रुपात प्रॅक्टिस करून अॅलोपॅथी औषधांचा साठा करणे, विनाप्रिस्क्रिप्शन, विनाबिल व वैध फॉर्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करणे तसेच अंमली औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषधी विभागाने कारवाई केली आहे. त्यात 1,21,56,981 रुपयांच्या औषघांचा साठा जप्त केला. विभागाने 295 मेडिकल स्टोअर्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर 264 चे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच 31 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द (canceled licenses of 31 medical stores ) करण्यात आले. यासोबतच चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या अनेक मेडिकल स्टोअर्सविरोधात एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आली.
मे. प्रकाश मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये एमटीपी किटची अवैधरित्या विक्री करताना आढळून आले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच डॉक्टरची डिग्री नसतानाही प्रॅक्टिस करणारे उमाकांत मानकर यांच्याकडे छापा टाकून 1,08,418 रुपयांचा अॅलोपॅथिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला. धन्वंतरी औषधालय, सचिन मेडिकल स्टोअर्स, गजानननगर, अजय मेडिकल स्टोअर्स, मे. हार्दिक एंटरप्राइजेस, सुरगुरु मेडिकल स्टोअर्स, मे. भागवत कृपा मेडिकल स्टोअर्स, दहेगाव, शाम मेडिकल स्टोअर्स, मे. संजोग फॉर्मा सर्जिकल, स्वामी कृपा ट्रेडर्स, मे. संदेश फॉर्मा, मे. संजीव मेडिकल स्टोअर्स, मे. कांचन मेडिकल स्टोअर्स आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
निकृष्ट औषधेही आढळली.
कारवाईत विभागाने काही मेडिकल स्टोअर्समधून निकृष्ट औषधांचा साठासुद्धा जप्त केला. यात कुणाकडे 1,36,032 रुपयांचा तर कुणाकडे 39,30,200 रुपये, 30,770 व 1,71,280 रुपयांसह अन्य मिळून 1.21 कोटी रुपयांचा औषघांचा साठा जप्त करण्यात आला. लूपिनला मिळून एकूण 29 स्टोअर्सवर छापेमारी करण्यात आली.